लॉकडाउनच्या चार टप्प्यांनंतर बाजारपेठा खुल्या करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार शहरातील बाजारपेठा सम-विषम पद्धतीने सुरू झाल्या. मात्र, दुकानात येणाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी महापालिकेने व्यापाऱ्यांना ऑक्सिमीटर व थर्मलगन ठेवणे बंधनकारक केले आहे. ही यंत्रसामग्री खरेदीसाठी १४ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची दुकानांवर तपासणी करणे महापालिकेने व्यापाऱ्यांना बंधनकारक केले आहे. त्यासाठी प्रत्येकाने थर्मलगन व ऑक्सिमीटर दुकानात ठेवावे.
थर्मलगनच्या माध्यमातून एखाद्याला ताप आहे का याची, तर ऑक्सिमीटरच्या माध्यमातून शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण व पल्सरेटची तपासणी होते. सुरुवातीला व्यापाऱ्यांनी सम-विषमसह यंत्रसामग्रीसाठी विरोध केला होता. मात्र आता विरोध मावळत आहे. आयुक्तांनी व्यापाऱ्यांना १४ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर दुकानांची तपासणी करून नियम न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिला असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.













